कायम चर्चेत असणारा चेहरा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:39 PM2019-12-30T16:39:11+5:302019-12-30T16:56:02+5:30

'अजित अनंतराव पवार' या नावाला गेल्या २३ नोव्हेंबरपासून विशेष वलय आला असले तरी अजित पवार हे कायम चर्चेत असतात. ते मंत्री असोत किंवा नसोत पण त्यांची चर्चा राजकीय वलयांकित आहे आणि राहील.

Short sketch of Deputy Chief minister NCP Ajit Pawar who elected from Baramati | कायम चर्चेत असणारा चेहरा : अजित पवार

कायम चर्चेत असणारा चेहरा : अजित पवार

googlenewsNext

पुणे : 'अजित अनंतराव पवार' या नावाला गेल्या २३ नोव्हेंबरपासून विशेष वलय आला असले तरी अजित पवार हे कायम चर्चेत असतात. ते मंत्री असोत किंवा नसोत पण त्यांची चर्चा राजकीय वलयांकित आहे आणि राहील. अजित पवारांना कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र 'दादा' म्हणूनच ओळखतो. त्यांच्यावर टीका करणारे विरोधकही 'दादा' संबोधूनच टीका करतात ते विशेष. बारामती  विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडून आलेले पवार यांना यावेळी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे.  

२०१९साली तर मुलगा पार्थ पवार यांची लोकसभेची उमेदवारी, आमदारकीचा राजीनामा आणि त्यावरही कळस म्हणून थेट भाजपसोबत घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ या तीन घटनांनी अजित पवार यांना राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही माध्यमांमध्ये झळकवलं  यात शंका नाही, १९९१सालापासून सुरु झालेली त्यांची राजकीय कारकीर्द ही कायम यशस्वी याच विश्लेषणाने ओळखली जाते. वेळ पाळण्यात अत्यंत पक्के, स्पष्टवक्ते, कोणतेही आढेवेढे न घेता आपले ठाम मत मांडणारे, मनस्वी आणि काहीसे संवेदनशील असे त्यांचे मिश्र व्यक्तिमत्व आहे. बहुतांशवेळा  'आज या ठिकाणी' म्हणत भाषणाची सुरुवात करणारे दादा कार्यकर्त्यांमध्येही प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या याच व्यक्तिमत्त्वामुळेच. अस्सल ग्रामीण ढंगात भाषण करताना पवार कोणत्या नेत्याची टोपी उडवलतील यांची शंका नसते, त्यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसणारेही सावध बसतात असं गंमतीने सांगितलं जातं.

कारकीर्द म्हणून बघायची झाली तर १९८२ साली छत्रपती कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. मात्र, शरद पवार यांच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. १९९१ मध्ये राज्य मंत्री म्हणून त्यांचा मंत्रीमंडळात पहिल्यांदा समावेश झाला. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस मंत्रीमंडळात ते पाटबंधारे मंत्री झाले. त्यानंतर सलग १५ वर्षे ग्रामविकास, फलोत्पान, अर्थ व नियोजन आदी पदे त्यांनी भूषविली. २०१२ ते २०१४ ते उपमुख्यमंत्री होते. पुणे जिल्हा सहकारी बॅँकेचे ते १६ वर्षे संचालक होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे १९९८ ते १९९९ अध्यक्ष होते. याशिवाय कबड्डी, खो-खो, ऑलिम्पिक संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. विविध शिक्षणसंस्थांवरही त्यांनी काम केले आहे. २००४ ते २०१४ ते पुण्याचे पालक मंत्री होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका त्यांनी एकेकाळी अक्षरशः एकहाती चालवले होते. 

 देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ७९ तास चाललेल्या सरकारमध्ये ते जरी सहभागी झाले असले तरी त्यांचे राष्ट्रवादीतले आणि कार्यकर्त्यांच्या मनातले स्थान आजही तेवढेच आहे हे वारंवार दिसून आले आहे. अगदी परवा म्हणजे शनिवारी पुण्यात कालवा समितीच्या बैठकीत 'अजित पवार इज बॅक' हे दिसून आले. त्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्यात पालकमंत्री म्हणून त्यांची प्रशासकीय कामे आणि विकासातली  'दादागिरी' पुन्हा दिसून यावी हीच जनतेची अपेक्षा आहे. 

Web Title: Short sketch of Deputy Chief minister NCP Ajit Pawar who elected from Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.