भोसरी : ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’या संकल्पनेवर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तरुण वर्ग रक्तदानासाठी नेहमीच तत्पर असतो़ त्यामुळे दात्यांची संख्याही वाढली. तरीदेखील केवळ गैरसमजातून अनेकांकडून रक्तदान करण्याचे टाळले जाते. मुख्य म्हणजे अशा गैरसमजातून उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तदानासाठी फारसे कोणी पुढे येत नाही. परिणामी, उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तसाठा कमी पडत असल्याने रक्तपेढ्यांची कोंडी होते. रक्तदान करण्याबद्दल सुरवातीच्या काळात नागरिकांमध्ये बरेच गैरसमज होते; परंतु जनजागृतीद्वारे ते दूर करण्यामध्ये काहीसे यश मिळाले असल्याचे आयोजित होणारी रक्तदान शिबिरे आणि त्यातून संकलित होणाऱ्या पिशव्यांवरून दिसून येते. सर्व रक्तपेढ्यांचा विचार केल्यास गेल्या तीन- चार वर्षांत रक्ततदात्यांच्या संख्येत ३० ते ३५ हजारांनी वाढ झाली आहे. यामध्ये एकट्या रेडक्रॉस सोसायटीत २०१५ मध्ये वर्षाला ७ हजार लोकांनी रक्तदान केले होते. ही संख्या आजच्या स्थितीला १८ हजारांवर पोचलेली आहे. (वार्ताहर)शहरातील वायसीएम रुग्णालयाची रक्तपेढी, रेडक्रॉस सोसायटी, तालेरा ब्लड बँक, लोकमान्य रक्तपेढी, डी़ वाय़ पाटील रक्तपेढी या प्रमुख संस्था रक्त संकलनाचे काम करत आहेत. या संस्था असतानादेखील अनेकदा रुग्णांच्या नातलगांना आवश्यक रक्ताची पिशवी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. कधी रक्ताचा तुटवडा, तर कधी रक्तपेढ्यांकडून होणारी अडवणूक कारणीभूत ठरत असते. तरीही मार्ग काढत रक्तपेढ्यांकडून थेट रक्तदात्यांशी संपर्क साधून गरजूंना रक्त उपलब्ध करून देतात. (वार्ताहर)
ऐन उन्हाळ्यात रक्तदात्यांचा तुटवडा
By admin | Published: April 20, 2017 7:00 AM