जून महिना संपत आला, तरी शिरूर तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने संपूर्ण क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. ज्या गावांमधे पाऊस पेरणीयोग्य झाला तेथे पेरण्या केल्या आहेत. पिकांना युरिया (नत्र) खते देणे आवश्यक आहे, मात्र खताचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने शेतकरी खते घेण्यासाठी गर्दी करीत असल्याचे मलठण येथील भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचे संचालक नानाभाऊ फुलसुंदर व टाकळी हाजी येथील मळगंगा कृषी सेवा केद्रांचे संचालक दत्तात्रय कांदळकर यांनी सांगितले. खत कंपन्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केली आहे. गावडे म्हणाले की, दर वर्षीच खरिपांच्या तोंडावर युरिया खताचा तुटवडा भासत असून शासनाने याकडे लक्ष देऊन पूर्वतयारी करीत खते उपलब्ध करून दिले पाहिजेत.
जून महिना संपला तरी टाकळी हाजी, पिंपरखेड, जांबूत, वडनेर, म्हसे, डोंगरगण परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने बाजरीच्या पेरण्या अत्यल्प प्रमाणात झाल्या असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे.
मलठण येथे युरिया खत घेण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत.