घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील अधिकारी मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी मदत करणार आहेत. या रुग्णालयांमध्ये सध्या औषधांचा तुटवडा असून शासनाकडून औषध पुरवठा होत नाही तर खरेदीसाठी पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना बाहेरून विकत औषधे आणावी लागतात. यासाठी अधिकाऱ्यांनी मदत करावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले.तालुका समन्वय व पुनर्वलोकन समितीच्या बैठकीत सर्वांनी प्रतिसाद देत मदत करण्याचे आश्वासन दिले. मागील दोन वर्षापासून सरकारी दवाखान्यांमध्ये मागणीप्रमाणे औषध पुरवठा होत नाही. तसेच खरेदीसाठी पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना बाहेरून विकत औषधे आणावी लागतात अशी अडचण मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा देशमुख व डॉ. गीता कुलकर्णी यांनी बैठकीत मांडली. वळसे पाटील यांनी सांगितले, की प्रशासकीय अधिकरी महेश झगडे यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून कुपोषण निर्मूलनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे दिले. तशी काही मदत आंबेगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनी मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वेच्छेने करावी. अवसरी येथील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निककॉलेजच्या आवारात रोडरोमिओंचा त्रास वाढला आहे. यासाठी मंचर पोलीस स्टेशनने येथे चौकी करावी तसेच सकाळ, दुपार, संध्याकाळ दामिनी पथक ठेवून बाहेरून येणाऱ्या मुलांचा बंदोबस्त करावा अशी सूचना त्यांनी केली. या निर्णयामुळे अनेक अडचणी निर्माण होणार असून, प्रथम लाभार्थ्याला पदरचे पैसे घालून वस्तू खरेदी करावी लागणार आहे तसेच जेव्हा मंजुरी मिळेल तेव्हा पैसे मिळतील. यामध्ये चिठ्ठी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होणार असल्याने गरजू व गरिबाला लाभ मिळेलच असे नाही. अशा प्रकारे शासन निर्णय घेऊन सगळ्याच योजना बंद करत चालले आहे अशी टीका वळसे पाटील यांनी या वेळी केली. बैठकीस प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, सभापती जयश्री डोके, उपसभापती सुभाष तळपे, सदस्य खंडू खंडागळे, नितीन केंगले, गटविकास अधिकारी राहुल काळभोर इत्यादी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)बॅँकेत खाती : अनेकांनी निधी दिला शासनाकडून निधी न मिळणारे खर्च भागविण्यासाठी मंचर व घोडेगाव ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या नावे बँकेत खाती काढली आहेत, या खात्यामध्ये यापूर्वी शरद सहकारी बँक, भीमाशंकर कारखाना अशा अनेकांनी निधी जमा केला आहे. आंबेगाव तालुक्यातील लग्न, दशक्रिया विधी अशा कार्यक्रमांमध्येदेखिल पैसे दिले जाऊ लागले आहेत. या खात्यामध्ये अधिकाऱ्यांनी पैसे जमा करून सामाजिक कामाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व अधिकारी जेवढे शक्य होतील तेवढे पैसे या सामाजिक कामाला मदत करतील, असे आश्वासन प्रांत अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिले.
रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा
By admin | Published: December 26, 2016 2:03 AM