इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे वसतिगृह अधिग्रहण करण्यासाठी आणि तेथील तयारी पाहण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धावती भेट दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, वसीम बागवान उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यामध्ये आज एक हजार ६६८ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. काहीजण शासकीय रुग्णालयात, खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत आहे, तर काहीजण गृह विलगीकरण झालेले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेड्स कमी पडत आहेत. रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रेमडेसिविरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये
रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिली आहे. तसेच ऑक्सिजनच्या मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होती तीही पूर्ववत होईल.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे वसतिगृह अधिग्रहण करण्यात आलेले आहे. या ठिकाणी ५० बेड आणि तरंगवाडी येथील वसतिगृहामध्ये १५० बेड तयार करत आहोत. याठिकाणी डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी असा कर्मचारीवर्ग असणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन बेड तयार करण्यात येत आहे. भिगवण येथे १०० ऑक्सिजन बेड तयार केलेले आहेत. बावडा आरोग्य केंद्रामध्ये याच धर्तीवर ऑक्सिजन बेड तयार करणार आहोत. इंदापूर तालुक्यामध्ये ७३० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एवढी बेड संख्या इतरत्र कुठेही नाही, असेही त्यांनी सांगितले.