लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ‘सीरम’चे डॉ. सायरस पूनावाला यांनी जाहीरपणे ‘पुण्यात जादा डोस देऊ, पण केंद्र सरकारची परवानगी हवी,’ असे सांगितले. पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस कमी पडण्याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे यावरून स्पष्ट होते अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.
जोशी म्हणाले की, लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमात डॉ. पूनावाला यांनी ‘सीरम’ची पुण्यासाठी लशींचे जादा डोस देण्याची तयारी असल्याचे सांगितले. मात्र, यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या पुण्यातील नेत्यांनी यावरून तरी बोध घ्यावा व केंद्र सरकारला जागे करावे.
कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत पुण्याला जबर तडाखा बसला. त्या वेळी ‘सीरम’चे आदर पूनावाला यांनी १४ मेला महापौरांना पत्र पाठविले व केंद्र सरकारची परवानगी घ्यावी, असे सुचविले. महापौरांनी त्या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू, बघू, करू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. लसीकरणाचे महत्त्व ओळखा, जादा डोस मिळवा. पुणेकरांच्या जिवाशी खेळू नका असे आवाहन काँग्रेसने त्याचवेळी भाजपचे खासदार, आमदार, महापौरांना केले होते, तीन महिने उलटले तरी भाजप नेते याबाबत गंभीर दिसत नाहीत, असे जोशी म्हणाले.
कोरोनाची साथ आटोक्यात आणणे हा राजकीय विषय नाही याचेही भान भाजपाच्या स्थानिक नेत्यांना नाही हे पुणे शहरासाठी धोकादायक आहे. अजूनही या नेत्यांनी शहाणे व्हावे व डॉ. सायरस यांना बरोबर घेत केंद्र सरकारकडून जादा लशींसाठी विशेष परवानगी आणावी, असे आवाहन जोशी यांनी केले.