पुणे : शहर आणि उपनगरांमध्ये वाहतुकीचे नियम तुडवून जाण्याचे जे अनेक प्रकार अवलंबिले जातात, त्यामध्ये वाहतूक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्याचा प्रकार सर्वांत घातक आहे. त्यामुळे अनेकदा अपघात होऊनही या प्रकाराला आळा घालण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेले नाही. नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना अशा घुसखोरांची डोकेदुखी झाली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.वाहतूक पोलिसांची गैरहजेरी असल्यास एकेरी रस्त्यावरून, नो एंट्रीमधून विरुद्ध दिशेने येण्याचा प्रकार मध्यवस्तीमधील टिळक रस्त्यावर मराठा चेंबर ते हिराबाग चौक दरम्यान सर्वाधिक आढळतो. स्वारगेटकडून येणारे दुचाकी आणि तीनचाकी वाहनचालक सरळ सारसबाग रस्त्याने जाऊन वळून टिळक रस्त्यावर येण्याऐवजी मराठा चेंबर आणि गणेश कला क्रीडा मंच दरम्यानच्या अरुंद रस्त्याने टिळक रस्त्यावर येऊन तेथील अंतर्गत छोट्या रस्त्यांनी शुक्रवार पेठेत घुसतात आणि मुख्य रस्त्यावर जातात.हिराबाग चौकात सायंकाळच्या वेळी पोलीस असल्याने तेथपर्यंत घुसखोर न जाता अलीकडील बोळांमधून हमरस्त्यांवर जातात.सिंहगड रस्त्यावरील वडगाव फाटा ते आनंदनगर दरम्यानच्या अनेक अंतर्गत लहान रस्त्यांवरून घुसखोर विरुद्ध दिशेने येतात. वडगावमधील दोन पूल, नॅशनल पार्क, माणिकबाग अशा भागांत वाहतूक प्रवाहाला अडथळा करणाऱ्या दुचाकीचालकांमुळे अनेकदा अपघात होतात. यामध्ये रिक्षाचालकांचाही समावेश असतो. धायरी फाट्याजवळील त्रिमूर्ती हॉस्पिटलजवळील रस्त्याने येऊन विरुद्ध दिशेने अभिरुची चौकीजवळील दुभाजकातून सिंहगड रस्त्यावर येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.दूरचा वळसा घेऊन मुख्य वाहतुकीत सामील होण्याऐवजी शॉर्टकट म्हणून वाहतूक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या या वाहनचालकांना रोखले नाही आणि कडक कारवाई केली नाही, तर त्यांच्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढतच जाणार आहे, असे काही त्रस्त वाहनचालकांनी सांगितले.पादचाऱ्यांची भंबेरी विरुद्ध दिशेने प्रवास करण्याचा सराव झालेले वाहनचालक बेदरकारपणे आणि वेगात जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांची भंबेरी उडते. वाद नकोत म्हणून आणि वेळ जाईल यामुळे अशा घुसखोरांशी वाद घालण्याच्या फंदात कोणी पडत नाहीत, त्याचा गैरफायदा घेतला जात आहे.दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांमुळे वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्यांची डोकेदुखी वाढतच चालली आहे. अलीकडे सायंकाळी वाहतुकीच्या वेळी खाकी वेषातील पोलिसांना नियुक्त केले गेले आहे. तरीही त्यांची नजर चुकवून किंवा त्यांनी थांबवू नये म्हणून भरधाव वेगाने जाणारे घुसखोर शहराच्या सर्वच भागांमध्ये दिसून येतात.
‘नो एंट्री’च्या शॉर्टकटने अपघात
By admin | Published: March 18, 2017 5:02 AM