अभिजित कोळपे
पुणे विद्यापीठात नुकताच गिर्यारोहण डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे. पुणे शहर हे जसे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तसेच, आता गिर्यारोहणाचे केंद्रस्थान बनत आहे. प्रशिक्षित आणि कुशल गिर्यारोहक हे सर्वाधिक पुणे शहरात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. गिर्यारोहण आणि साहसी खेळामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, गिर्यारोहण शिक्षण अथवा प्रशिक्षण हे केवळ ऑनलाइन पद्धतीने देता येणे शक्य नाही. ते केवळ आणि केवळ प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन प्रात्यक्षिक केले तरच त्या क्षेत्राचा विकास होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते.
गिर्यारोहण या विषयातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. मात्र, ॲकॅडेमिक पेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर प्रात्यक्षिक दिल्यास ते अधिक लाभदायक होईल आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी फायद्याचे होईल, असे तज्ज्ञांना वाटते. केवळ ऑनलाइन शिक्षण दिल्यास त्याचे गांभीर्य कमी होईल. अनेकजण केवळ डिप्लोमा प्रमाणपत्र मिळतेय म्हणून याकडे पाहून प्रवेश घेतील.
किती गड, किल्ल्यांवर प्रशिक्षण देता येईल हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि त्यानंतर देशपातळीवर असे किती स्पॉट, ठिकाणे आहेत. जेथे गिर्यारोहण करता येईल याची माहिती उपलब्ध लोकांना करून द्यावी. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक देता येईल यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.
गिर्यारोहण उपक्रमात आपण येणाऱ्या काळात किती तरुणाईला यात सामावून घेणार आहोत. त्यासाठी प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचे उपक्रम हाती घेता येईल. त्यात प्रामुख्याने गावोगावी कॅम्प आयोजित करणे, गाव, तालुका, शहर आणि जिल्हा पातळीवर कार्यशाळा आयोजित करणे हे प्रामुख्याने करावे लागेल.
गिर्यारोहण वाढवण्यासाठी तरुणाईला कॉलेज, विद्यापीठात बोलावण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. तरच या क्षेत्राचा विकास होऊ शकतो. अन्यथा पुणे शहरच नाही तर राज्य आणि देशात केवळ प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक कॉलेज, विद्यापीठ सुरू होतील. आणि त्यातून भरमसाठ शुल्क आकारून त्याला केवळ व्यावसायिक स्वरूप येण्याची शक्यता आहे. ते टाळायचे असेल तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यावर भर असायला हवा, असे या क्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या जाणकार, तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.