- प्रज्ञा केळकर-सिंग-
* प्रकाशनाच्या सद्यस्थितीबाबत काय सांगाल?- तूर्तास काही प्रमाणात वाचकवर्ग कमी झाल्यासारखा वाटत असला तरी ही स्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. अशा पद्धतीने चढ-उतार येतच असतात. त्यामागील काही कारणे तात्कालिक, तर काही कायमस्वरूपी असतात. तंत्रज्ञान हे सध्याचे सर्वात प्रभावी कारण आहे. तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलामुळे वाचनाची माध्यमे बदलत आहेत. ऑडिओ बूक, ई बूक अशी माध्यमे वाचकांना उपलब्ध झाली आहेत. या माध्यमांचा लक्षणीय परिणाम मूळ वाचकवर्गावर मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पुढील काळात या माध्यमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे पुरेसे संकेत आता मिळू लागले आहेत. वाचक वगार्तील ही स्थित्यंतरे कमी-जास्त प्रमाणात सुरू असतात. त्यामुळे भविष्यात पुस्तकांचा वाचक आणि या नवीन माध्यमांचा वाचक अशी आशादायी परिस्थिती नक्कीच पहायला मिळेल.
* रॉयल्टी, कॉपी राईट अशांतून बरेचदा प्रकाशक-लेखक यांच्यात वाद उदभवतात. यावर उपाय काय?- प्रकाशक-लेखक संबंध कायम चांगलेच असतात. परस्पर संबंधात ज्या ५-१० टक्के अडचणी येतात, त्या टाळण्यासाठी सर्वांनी काळाची पावले ओळखून याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. पारदर्शक पद्धतीने व्यवहार करणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर गोष्टींचा आधार घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात. आजवर प्रकाशन व्यवसायातील काम केवळ विश्वासावर सुरू होते. मात्र, आता व्यवसायिक दृष्टीकोन स्वीकारून कागदपत्रे तयार करणे, नव्या कॉपी राईटचे नियम समजावून घेणे दोन्ही बाजुंनी गरजेचे बनले आहे.
* एकीकडे शहरी भागातील वाचकांना मुबलक साहित्य उपलब्ध होत असताना, ग्रामीण भागातील वाचकांची साहित्यिक भूक भागवण्यात प्रकाशक कमी पडतात, असे वाटते का?- गेल्या दहा वर्षांमध्ये शहरातील पुस्तक प्रदर्शनांचा प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे पुस्तकांची प्रदर्शने भरवणा-या संस्थानी हे प्रमाण कमी केले आहे. ग्रामीण भागातील वाचकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी महत्वाच्या चार-पाच प्रकाशकांनी एकत्र येऊन नवीन वाचकवर्ग मिळवण्यासाठी खेडेगावापर्यंत पोहोचले पाहिजे. ऐंशीच्या दशकामध्ये अशा पद्धतीची लाट पहायला मिळाली होती. ग्रंथमेळे, ग्रंथजत्रा, लेखक-वाचक संवाद, अभिवाचन यांसारख्या उपक्रमांमधून ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवता येईल. वाढते खर्च पाहता आता एकेक दोन-दोन प्रकाशकांना ग्रामीण भागात पोहोचणे अवघड होते आहे. त्यामुळे फिरत्या पुस्तक जत्रा, फिरते प्रदर्शने यासाठी प्रकाशकांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील.
* दुर्मिळ साहित्याच्या संवर्धनासाठी प्रकाशकांच्या पातळीवर कोणते प्रयत्न आवश्यक आहेत?- साहित्य अजरामर असते. काळाच्या ओघात काही साहित्य प्रकार मागे पडतात. वाचकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन चांगल्या दुर्मिळ पुस्तकांचे पुर्नमुद्रण विविध योजनांच्या माध्यमातून प्रकाशक हाती घेऊ शकतात. डिजिटायझेशनच्या माध्यमातून साहित्याच्या जतन आणि संवर्धन प्रक्रियेला हातभार लागू शकतो. त्यादृष्टीने प्रकाशकांच्या पातळीवर प्रयत्न सुरूच आहेत.