पुणे - आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान करताना तृतीयपंथीयांना धरुन आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यांच्या या विधानामुळे आपल्या भावना दुखावल्याचे सांगत पुण्यातील तृतीयपंथी रस्त्यावर उतरले आहेत. येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनला तृतीयपंथीयांना रात्रीपासून आग्रह करत आमदार नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याला पाठिंबा देत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्डन पोलीस स्टेशनला भेट देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तृतीयपंथींनी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. सकाळी आंदोलन सुरु असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. तर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्ड पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांशी संवाद साधला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी थेट गृहमंत्रालयावर निशाणा साधला.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, आजची घटना ही थेट गृहमंत्रालयाला लागलेला कलंक असल्याचे म्हणत पुण्यातील घटनेवरुन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पोलिसांना सध्या कोणतंच प्रकरण हाताळता येत नाही. गृहमंत्रालयाची त्यांच्यावरील पकड किती ढिली झालीय हे दिसून येतं. चर्नी रोडवरील वसतिगृहातील प्रकरण असेल, एका शासकीय वसतिगृहातील बलात्कार आणि खून प्रकरण असेल किंवा सामूहिक बलात्कार आणि हत्येची प्रकरणं पाहिली तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी असल्याचं ठरत आहेत. तसेच, आजचा पुण्यातील तृतीयपंथीयांवरील निरुपद्रवी हल्ला हा माणूसकीला काळिमा फासणार आहे, पण, गृहखात्यावर कंलक लावणारा आणि गृहखातं कलंकित करणारा आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
कलंकाला कंलक नाही तर अष्टगंध म्हणायचं का?
उद्धव ठाकरेंनी बोलताना चूक केली असं अजिबात म्हणता येणार नाही, कलंकाला कलंक नाही तर काही अष्टगंध म्हणायचं का, असा प्रतिसवाल सुषमा अंधारे यांनी केला. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मृतांचा अंत्यविधी सुरू असताना एक पक्ष फोडून शपथविधी केला जातो हा कंलक नाही का, एक-एक पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली जाते हे कंलक नाही का, येथील महिला-भगिनी असुरक्षित आहेत, मुली गायब होतात हा कलंक नाही का, असे अनेक सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी केले.