पुणे: शहरात वारंवार अस्वच्छता असलेल्या ठिकाणांंसाठी सुमारे ८२ हून अधिक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेच्या एखाद्या परिसरात वारंवार कचरा साचत असल्यास आणि नागरिकांकडून वारंवार कचरा टाकल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक तसेच मोकादमांवरही कारवाई केली जाणार आहे.
पालिकेने नागरिकांनी उघडयावर कचरा टाकू नये तसेच घरीच वर्गीकरण करून महापालिकेच्या यंत्रणेकडे द्यावा, यासाठी शहरातील कचरा पेट्या बंद केल्या आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांना शिस्त लागण्याऐवजी कचरा टाकण्याची ठिकाणे दुपटीने वाढली आहेत. त्यामुळे हे स्पाॅट कमी करण्याची जबाबदारी संबंधित प्रभागाच्या कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षकांची आहे. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने आता नागरिकांसोबतच महापालिका प्रशासनाकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरिक्षकांच्या कामावरही नियंत्रण ठेवण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांप्रमाणेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या फिल्ड वर असलेल्या निरिक्षकांचाही शहरात कचरा साठणार नाही तसेच नवीन ठिकाणे तयार होणार नाहीत यासाठी खबरदारी घेणे तसेच कारवाई करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून त्याकडे दूर्लक्ष झाल्याचे आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.