पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नाेंदवण्याच्या न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्याबद्दल हडपसरपोलिसांना लष्कर न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे वकील साजिद शाह यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर हडपसरपोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी एका पीडित तरुणीने विशाल सूरज सोनकर (रा. वानवडी गाव) याच्यासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हडपसर पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पीडितेने ॲड. साजिद शाह यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात धाव घेत, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) नुसार खासगी तक्रार दाखल केली. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले, तिची आर्थिक फसवणूक केली, तसेच तिची आक्षेपार्ह छायाचित्रे ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत, तिच्या नातेवाइकांना पाठविल्याचे पीडितेच्या तक्रारीत नमूद आहे. त्याची दखल घेत लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश हडपसर पोलीस ठाण्याला दिले.
त्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन न्यायालयाच्या आदेशाची प्रत पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे पीडितेने ॲड. साजिद शाह यांच्यामार्फत हडपसर पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात तक्रार अर्ज दिला. त्यावर न्यायालयाने हडपसर पोलिसांना न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.