पुणे: पुण्याच्या गणेशोत्सवाची देशात प्रशंसा केली जाते. मानाचे गणपती, हजारोंच्या संख्येत गणेश मंडळे विसर्जनाला शिस्तबद्ध रांग हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण आहे. उत्सवात दरवर्षी मंडळे नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन येत असतात. तसेच विसर्जन मिरवणुकीत सामाजिक विषयांशी निगडित देखावे करत असतात. यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत तरुणांना आव्हान करणारा उत्तम देखावा वैभव मित्र मंडळाने साकारला होता. एका कोयत्यामुळे आयुष्य बरबाद करू नका’ असा संदेश तरुणांना या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्याबरोबरच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांचे चित्र साकारण्यात आले होते.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत सुरु आहे. अल्पवयीन मुले, तरूणांकडून धमकावणे, हल्ले करणे अशा अनेक घटनाही घडल्या आहेत. अशा वेळी नुकताच उपायुक्त पदाचा कारभार हाती घेणारे संदीपसिंग गिल यांनी मुलांना आणि तरुणांना कडक इशारा दिला होता. तुम्ही हातात कोयता घेऊनच दाखवा मग दाखवतो तुम्हाला असं ते म्हणाले होते. यावरूनच मंडळाने गणपती बाप्पाबरोबर गिल यांचे चित्र रथावर दाखवले आहे. त्यामधून तरुणांना आव्हान देण्याबरोबरच 'आयुष्य खूप सुंदर आहे ते एका कोयत्यामुळे बरबाद करू नका' असा संदेशही देण्यात आला होता. तर दुसरीकडे ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवा मग दाखवतो तुम्हाला… बल्ले बल्ले’ असा मजकूर देखील देखाव्यावर लिहिण्यात आला होता.