पुणे : ‘लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा! दाखवणार ना?’ असा प्रश्न महिलांना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही ‘पुढची ५ वर्षे योजना सुरू ठेवायची, तर आगामी निवडणुकीत आमची निवडणूक चिन्हे लक्षात ठेवा,’ असे आवाहन केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुलात योजनेची सुरुवात करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यावेळी उपस्थित होते. विरोधकांपैकी कोणीही पदाधिकारी वा आमदार कार्यक्रमाला हजर नव्हते. सावत्र भावांवर मात करून आलोय. तुम्ही त्यांना लक्षात ठेवा. काहीही बोलतात. मनाची नाही तर जनाची तरी ठेवा. नाद सगळ्याचा करा, आमचा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
बहिणींना काही द्यायचे होते, म्हणून हा निर्णयमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘तुम्ही संसार चालवताना कसरत करता, सरकार चालवताना आम्हालाही कसरत करावी लागते. बांधील खर्च करावाच लागतो; पण लाडक्या बहिणींना काहीतरी द्यायचे होते. म्हणून हा निर्णय केला. विरोधक म्हणतात, ‘लाडक्या भावांचे काय?’ त्यांना कधी प्रेम होते का भावांबद्दल? मग ते सोडून गेले असते का? आज मिळालेल्या लाखो भगिनी ऊर्जा देणाऱ्या आहेत. या शक्तीच्या जोरावरच सर्वांना पुरून उरलोय.
पंधराशेचे ३,००० होतीलसरकारला ताकद द्या. देण्याची ताकद लागते. ती आम्ही दाखवली आहे. ताकद वाढवा, पंधराशेचे २ हजार होतील, अडीच हजार होतील व ३ हजारही होतील. आम्हाला बहिणींना लखपती झालेले पाहायचेय. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीहे ‘देना’ सरकार आहे, ‘लेना’ सरकार नाही. मागचे सरकार वसुली सरकार होते. आम्ही देणारे आहोत. तुमच्या सावत्र भावांना योजना होऊ द्यायची नव्हती; पण काही झाले नाही. पूर्वीच्या योजना दलालीच्या होत्या. पंतप्रधान मोदींमुळे ‘आधार, बँक खाते, पैसे जमा’, असा त्रिशूळ तयार झाला. दलाली संपली आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
विरोधक कारण नसताना टीका करतात. भावांनाही वीजमाफी केली. दुधाचा दर वाढवून दिला, तरीही टीका होते. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री