पुणे : केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेले कलम 370 रद्द केले. या निर्णयाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. परंतु या निर्णयानंतर काश्मीरला दिलेला विशेष दर्जा आता काढून टाकण्यात आला असून तेथे आता भारतीय संविधान पुर्णपणे लागू झाले आहे. याच 370 कलमावर पुण्यातील संजय तांबाेळी यांनी आपल्या घरात देखावा तयार केला आहे. यात 370 कलम असताना काश्मीरमधील लाल चाैक आणि 370 कलम काढून टाकण्यात आल्यानंतर असणारा लाल चाैक याचा देखावा साकारला आहे.
काश्मीरला विशेष दर्जा असलेले कलम 370 काढून टाकण्यात आले आहे. अनेकांना हे कलम काय हाेते आणि त्यामुळे काश्मीरला विशेष दर्जा कसा प्राप्त झाला हाेता, याबाबत माहिती नव्हती. तसेच आता हे कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये कुठले बदल हाेतील. याची माहिती तांबाेळी यांनी आपल्या देखाव्यातून दिली आहे. देखाव्यामध्ये काश्मीरमधील लाल चाैक साकारला आहे. हा फिरता लाल चाैक असून एका बाजूला 370 कलम लागू असताना काश्मीरचा आधीचा ध्वज दाखविण्यात आला आहे. तर दुसरीकडे 370 हटविल्यानंतर तिथे भारताचा डाैलाने फडकणारा तिरंगा दाखविण्यात आला आहे.
तांबेळी म्हणाले, 370 कलम हटवणे हा सरकारने घेतलेला अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. हे कलम काढून टाकल्यामुळे काश्मीरमध्ये काय सुधारणा हाेतील हे मांडण्याचा देखाव्यातून प्रयत्न केला आहे. 370 कलम लागू असताना काश्मीरच्या लाल चाैकामध्ये काश्मीरचा ध्वज फडकत हाेता, आता हे कलम काढून टाकल्याने तेथे आता भारताचा झेंडा फडकताे आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गाेष्ट आहे. हेच दाखविण्याचा प्रयत्न या देखाव्यातून केला आहे.