सोमेश्वरनगर : श्रीक्षेत्र करंजे (ता. बारामती) येथील प्रति सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे ८० हजार भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले.
सोमवारी भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेऊन हर हर महादेवाचा जप केला. मध्यरात्री बारा वाजता सोलापूर बस आगाराचे आगारप्रमुख रमाकांत गायकवाड आणि बारामती राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली.यावेळी सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचिव सुनिल भांडवलकर, विश्वस्त प्रवीण भांडवलकर, प्रकाश मोकाशी, दादा शिंदे, सुरेश देवकर, बाबासाहेब होळकर यांच्यासह हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धार्थ गीते, दादा शिंदे आणि डॉ मनोहर जगताप यांच्या वतीने भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आली. तर रात्रीच्या महाप्रसादाची सोय सातारा येथील बाबासाहेब कडवं आणि अनिल होळकर आणि मागार्सानी ग्रामस्थ यांनी केली होती. मुंबई, कोकण, ठाणे येथील विशेषता कोळी बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळीच सर्परुपी सोमनाथाने दर्शन दिल्याने भाविकांनी याठीकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी मोफत पार्किंग, पिण्याच्या पाण्याची आणि भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ.नम्रता ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी मोफत औषधोपचाराची सोय करण्यात आली होती. बारामती, सासवड बस आगारांनी जादा बसेस ची सोय केली होती, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनी विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.