- तेजस टवलारकर-
वरवंड : पंढरीच्या वाटे सुख जिवा आस ती भेटावया पांडुरंगा..! पांडुरंगावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भक्ताची स्थिती याहून वेगळी ती काय असते.. परंतु वारीला पायी जाणे, पांडुरंगाचे दर्शन घेणे सगळ्यांना शक्य नसते. वृद्ध मंडळीना वारीला जाण्याची कितीही इच्छा असली तरी ते जाऊ शकत नाहीत. त्यातही हलाखीची परिस्थिती असेल तर वारी घडणे महाकठीण.. हवेली तालुक्यातील विठ्ठलभक्त फुलचंद गणपतराव कायगुडे या श्रावणबाळाने सुंदर युक्ती लढवत आपल्या आई वडिलांना काहीवर्षांपूर्वी पंढरीची वारी घडवली.. त्यानंतर फुलचंद यांनी ही वारीची परंपरा गेली सतरा वर्ष कायम ठेवली आहे.. पंढरीच्या विठू माऊलीला भक्तांची कणव आहेच.. त्याच्या दर्शनाची आस लागलेल्या आणि ध्यास घेतलेल्या एकाही भक्ताला तो अपूर्णात ठेवत नाही, हे सत्य वारकरी संप्रदाय जाणून आहे..अडचणींचा महापूर येऊन तो तुमची अतोनात परीक्षा पाहतो.. परंतु सरतेशेवटी तो भक्तांची नौका पंढरीच्या तीराला लावतो..