ओतूर : श्रीक्षेत्र ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर शिवलिंग व कोरड्या तांदळाच्या तीन कलात्मक पिंडीचे लाखो भाविकांनी हरहर महादेव जयघोषात दर्शन घेतल्याची माहिती कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली. यात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दर्शनासाठी भाविकांनी पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. याप्रसंगी दाजी धिरडे, लीला धिरडे, अध्यक्ष अनिलशेठ तांबे, सचिव वसंत पानसरे, सहसचिव संजय डुंबरे, महेंद्र गांधी पानसरे, वैभवशेठ तांबे, राजेंद्र डुंबरे, जितेंद्र डुंबरे, अमोल डुंबरे या भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दर्शनरांगेचे व्यवस्थापन सागर दाते, पांडुरंग ढोबळे, पांडुरंग ताजणे, नितीन तांबे, राजेंद्र हांडे-देशमुख, विश्वास तांबे, सतीश तांबे, प्रशांत डुंबरे, स्मिता डुंबरे यांनी केले. पटेल ग्रुप ओतूर यांच्यावतीने भाविकांसाठी खिचडी, ब्लू डायमंड ग्रुप व सतीश डुंबरे यांनी केळीवाटप केले. दिलीप धोंडिभाऊ घोलप यांच्याकडून चहा देण्यात आला. या यात्रेच्या बंदोबस्तासाठी जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना व ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ३४ पोलीस कर्मचारी, ५ महिला पोलीस १५, होमगार्ड ३०, पोलीसमित्र २० पोलीसपाटील तैनात केले होते.
यात्रेच्यानिमित्ताने कपर्दिकेश्वर देवस्थान समिती व आळेफाटा येथील ओम चैतन्य हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजिण्यात आले होते, असे अध्यक्ष अनिल तांबे व स्वाती घोलप यांनी सांगितले. तसेच यानिमित्ताने कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. यावेळी अनेक पैलवान कुस्तीगीर मुली यांनी कुस्त्या केल्या. वाजत-गाजत कुस्त्यांच्या आखाड्यास प्रारंभ झाला. कै. श्रीकृष्ण तांबे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कुस्त्या प्रारंभ करण्यात आल्या. कुस्तीचे पंच म्हणून छबुराव थोरात, अविनाश ताजणे, विकास डुंबरे, उल्हास गाढवे, माजी सरपंच धनंजय डुंबरे यांनी काम पाहिले. यामध्ये ५० रुपयांपासून पाच हजार रुपयांची कुस्ती लावण्यात आली होती. मुलींच्या कुस्तीत सायली कुरकुटे व सिद्धी पवळे यांची कुस्ती नेत्रदीपक झाली. कुस्ती आखाड्यात चैतन्य विद्यालय, सरस्वती विद्यालय, उदापूर पुष्पावती विद्यालय डिंंगोरे येथील एस. एस. सी. परीक्षा मार्च २०१८ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना देवधर्म संस्थेच्यावतीने एक हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कुस्ती आखाड्यास अध्यक्ष अनिल तांबे, वैभव तांबे, रघुनाथ तांबे, शरद चौधरी, महेंद्र पानसरे, भास्कर डुंबरे, वैभव तांबे, सरपंच बाळासाहेब घुले, चाँदशेठ मोमीन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. श्रीकपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यात्रेमुळे सर्व परिसर अस्वच्छ होतो.या परिसराची स्वच्छ भारत या अभियानांतर्गत ओतूर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभाग, ओतूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली व तीन ट्रॅक्टर ट्रॉल्या कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली, अशी माहिती प्राचार्य डॉ. साळवे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे व सरपंच बाळासाहेब घुले यांनी दिली. ही स्वछता मोहीम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बागुल, एनसीसी विभागप्रमुख प्रा. नीलेश हांडे, ओतूर पोलीस ठाण्याचे पाटोळे, सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या सर्वांनी रोहकडी वेस ते कपर्दिकेश्वर मंदिर, चैतन्यमहाराज मंदिर परिसर, कुस्ती स्टेडियम, नदी परिसराची सफाई केली.