लोकमत न्यूज नेटवर्कखळद : राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू झाला आहे. या संपाला पुरंदर तालुक्यातील यमाई, शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देत सरकारविरोधी घोषणा दिल्या. यमाई शिवरी येथे बाहेरून आलेली दुधाची गाडी अडवत रस्त्यावर दूध ओतून या सरकारचा निषेध केला.सकाळपासून सर्वत्र संपाचे वातावरण पाहायला मिळाले. असंख्य शेतकऱ्यांनी आपले दूध घरीच ठेवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या असंख्य मुलांनी आपला पाठिंबा दिला. काही ठिकाणी भाजीपाला शेतात तसाच ठेवणार, पण बाजारात कवडीमोल किमतीत विकायला नेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यमाई शिवरी येथे सकाळी ९ वा. शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज परिसरातील शेतकऱ्यांनी येथील पालखी विसावा सभामंडपात एकत्र येऊन या संपाला जाहीर पाठिंबा दिला. शुक्रवारपासून कोणताही शेतकरी आपले दूध, भाजीपाला बाजारात नेणार नाही व या भागातून दुधाचे, भाजीपाल्याचे एकही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. एकनाथ कामथे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही. भाजीपेक्षा रद्दी महाग, दुधापेक्षा पाणी महाग, निर्यातबंदी केली अशा सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेमुळे आत्महत्या वाढल्या आहेत. हे सरकार शहरी भागाला धार्जिन असून त्यांना भाजीपाला स्वस्त देताना ग्रामीण भागातील शेतकरी, त्यांच्या भावी पिढी उद्ध्वस्त करण्याचे काम करीत असून, दूध, फळे, भाजीपाला कोणत्याही परिस्थितीत शहरात पाठवणार नाही व जाऊही देणार नसल्याचे नवनाथ कामथे यांनी सांगितले. जो दुधाची, फळे, भाजीपाल्याची वाहतूक करेल त्यांना आज ताकीद पण उद्यापासून मात्र जशास तशे उत्तर दिले जाईल, असे अंकुश कामथे यांनी सांगितले.
शिवरी गावात दूध ओतले रस्त्यावर
By admin | Published: June 02, 2017 1:56 AM