श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या १२९व्या वर्षीच्या गणेशोत्सवात आॅगमेंटेंड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी आॅनलाइन दर्शन घ्यावे, यासाठी या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल आर्ट व्हिआरईचे संचालक अजय पारगे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, http://www.DagdushethGanpati.net या लिंकवर जाऊन घरी भक्ताने आरती करतानाचा व्हिडिओ काढल्यास प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात श्रींची आरती करतानाचा व्हिडिओ तयार होत आहे. आपण गाभाऱ्यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा आनंद व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येत आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, आँस्ट्रेलिया, ब्रिटन, यूएई, सिंगापूर, जर्मनी, कतार, न्यूझीलंड, ओमान, आर्यलंड, नेदरलँड, मलेशिया, स्वीडन, जपान, नायजेरिया, सौदी अरेबिया अशा सुमारे ६० देशांतील भक्तांनी या तंत्राचा वापर केला आहे.''
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, माजी सेनाधिकारी डी. बी. शेकटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तरिता शंकर, राजू सांकला, अभिनेते प्रशांत दामले यांसह समाजातील अनेक मान्यवरांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून बाप्पाची आरती करण्याचा व व्हिडिओद्वारे अनुभवण्याचा आनंद घेतला आहे. भाविकांनी या तंत्राचा वापर करावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.