लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: येथील श्री सिद्धेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या यात्रेच्या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि. १०) ते शुक्रवार (दि १२) भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष एकनाथ सांडभोर, विश्वस्त नंदकुमार कोरे यांनी दिली.
दर वर्षी महाशिवरात्रीनिमित्त श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून, जवळच्या वाड्या-वस्त्यांमधून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यांतून सुमारे १ लाखाच्या वर भाविक येतात. ही होणारी गर्दी कोरोनाच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते. सध्या अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. गर्दीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विश्वस्त मंडळाने शासनाच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेतला आहे, असे कोरे यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीची सालाबादप्रमाणे भरणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून यात्रेमध्ये येणारे भाविक दुकानदार, तसेच इतर किरकोळ सर्व दुकानदार यांनी यात्रा रद्द झाल्याची घ्यावी. भाविकांनी याचे पालन करून कोरोनाच्या निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरात दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवण्यात येणार आहेत.