पुणे : बिबवेवाडी येथील बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यानी पत्रके भिरकावीत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मुझय सभेमध्ये चर्चेला तोंड फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप आणि भाजपाचे नगरसेवक सुनील कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. समाजाची दिशाभूल करण्याच्या विषयावरून दोन्ही नगरसेवक एकमेकांना भिडले होते. सर्व पक्षीय नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याने वाद थंडावला.
या स्मारकामध्ये स्वतंत्र ग्रँथालय, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र संगणक लॅब, व अण्णाभाऊ साठे कलादालन करण्यासाठी पालिकेकडून निधीची मान्यता मिळालेली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. तरीही स्थानिक नगरसेवकांच्या दबावामुळे कामामध्ये विलंब लागत असल्याचा आरोप कार्यकर्त्यानी केला. यावेळी प्रश्नाल उत्तर देताना स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांना विरोध दर्शवित काँग्रेसचे अरविंद शिंदे, अविनाश बागवे, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे आदी नगरसेवक आक्रमक झाले.
मातंग समाजाच्या तरुणांची उपेक्षा करू नका, अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या समाजाबाबत असा पवित्रा घेणे चूक आहे असे जगताप यावेळी म्हणाले. समाजावर अन्याय करू नका, त्याचे परिणाम भोगावे लागतील. समाज आक्रमक होऊन आंदोलन करील असे आक्रमकपणे मुद्दे मांडत असतानाच भाजपाचे नगरसेवक सुनील कांबळे बोलू लागले. समाजाची दिशाभूल कोण करतो या विषयावरून कांबळे आणि जगताप यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली.
सभागृहामध्ये तणाव निर्माण झाला होता. सर्व पक्षीय नगरसेवकांनी तात्काळ दोघांनाही शांत केले. चर्चेचे गांभीर्य ओळखून सभासदांच्या मागणीनुसार, महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त सौरभ राव, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा वाद थांबला.