पुणे: सीड इन्फोटेकचे सहसंस्थापक, सह प्रवर्तक श्रीकांत रासने (५५ वर्षे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नी देवयानी, मुलगा, मुलगी, आई, काकू असा परिवार आहे.
पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. कुसरो वाडिया आणि आय आय टी पवई येथें संगणक शास्त्र या विषयात शिक्षण घेऊन त्यांनी भारत सरकारच्या डी आर डी ओ तसेच इस्रो साठी शास्त्रज्ञ पदावर काम केले. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलेली कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी सीड इन्फोटेक ची सह संस्थापक आणि सह प्रवर्तक म्हणून सुरवात केली. मागील २५ वर्षांमध्ये त्यांनी लाखोंच्या संख्येने मनुष्यबळ प्रशिक्षित केले. तसेच राष्ट्रीय कौशल विकास (NSDC) संस्थेबरोबर कौशल्य आणि पुनर्रकौशल्य या क्षेत्रात भरीव काम केले. NSDC ने त्यांचे काम राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
पूर्वापार काळापासून त्यांचे कुटुंब साईभक्त आहे. साई चरित्रात रासने कुटुंबाचा प्रकर्षाने उल्लेख असून शिर्डीच्या साईमंदिरावर त्यांच्या कुटुंबाचे निशाण असते. तीच परंपरा पुढे नेत सामाजिक कार्यात शिवाजी नगर येथील साईदास मंडळाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले. मंडळाद्वारे त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी हि तत्व त्यांनी सदैव आचरणात आणली. प्रत्येक माणसात असणाऱ्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास होता व्यावसायिक मूल्यांवर श्रद्धा होती. तसेच कोरोना च्या कठीण समयी व्यवसायिक आव्हानांना सामोरे जात असतांना ते इतर व्यावसायिकांना मित्र, मार्गदर्शक या नात्याने बळ देत राहिले. प्रसिद्धीच्या वलयापासून कायम दूर राहणारे यशस्वी व्यावसायिक, उत्तम प्रशिक्षक, अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून ते लक्षात राहतील.