लोणी कंद : धर्मवीर संभाजीराजांच्या ३३० व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापुरात विविध कार्यक्रम आयोजित केले असून, सभामंडप, स्वागत कमानी, भगवे झेंडे, पिण्याचे पाणी, वाहनतळ अशी सर्व तयारी झाली असून, तुळापूरनगरी शंभूभक्तांसाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत यांनी दिली.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यस्मरण दिनासह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सकाळी ८ वाजता श्री संगमेश्वराला अभिषेक व श्री छत्रपती शंभूराजांची पूजा मान्यवरांच्या हस्ते होईल. छत्रपती संभाजीराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणून मुख पदयात्रा निघेल. यामध्ये हजारो तरुण सहभागी होतील. त्यानंतर साखळदंडाचे पूजन करण्यात येईल. यानंतर ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, ह.भ.प. गीतांजली झेंडे, शंतनू धावडे यांचे व्याख्यान होईल. तसेच मैदानी खेळाचे साहसी प्रात्यक्षिक होणार आहे. व्यसनमुक्ती महासंघाच्या वतीने शक्ती शौर्य यात्रा पेडगाव ते तुळापूर ही काष्टी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, टाकळी भीमा, धानोरे, कोरेगाव भीमा अशी मजल-दरमजल करत तुळापूरनगरीत दाखल होईल. या वेळी ह.भ.प. युवक मित्र बंडातात्या कराडकर मार्गदर्शन करतील. पुरंदर ते तुळापूर अशी धर्मवीर संभाजीमहाराज पालखी सोहळा संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली येईल. तसेच या वर्षी प्रथमच पोलीस दलाच्या वतीने प्रथमच शासकीय सलामी देण्यात देणार आहे. त्यानंतर कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. रंगरंगोटी, डागडुजी, लगीनघाई चालली असून, सभामंडप, पिण्याचे पाणी, वाहनतळ उत्तम व्यवस्था केली जात आहे. तसेच येणाऱ्या शंभूभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, सरपंच गणेश पुजारी, अमोल शिवले, राहुल राऊत, माजी सरपंच रूपेश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, पेरणेचे उपसरपंच रवींद्र वाळके, संजय शिवले आदींनी दिली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांना साथ देणाºया १२ मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान तसेच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील सर्व कलाकार भेट देणार आहे. त्यांचा सन्मान तसेच या मालिकेतील पोवाडा गायक शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी एक वाजता सर्व शंभूभक्तांच्या उपस्थितीत प्रेरणामंत्र ध्येयमंत्र होईल. यानंतर सामुदायिक मानवंदना तसेच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होईल.