बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी नेहमी भाविक, पर्यटकांची गर्दी होत असते. याशिवाय भीमाशंकर अभयारण्यातील नागफणी पॉइंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉइंट, भाकादेवी पाॅइंट कोंढवळ धबधबा, गोहे पाझर तलाव, डिंभे धरण, आहुपे आदी पर्यटनस्थळांवरही नागरिक, पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी भेट देतात. महाशिवरात्रीनंतर श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त निसर्गप्रेमी व पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. विशेषत: होळी धूलिवंदन या सणांनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मंदिर परिसरातील बेल-फूल, माळ, रूद्राक्ष, डोलीवाले, वनस्पती औषधे, खेळणी, हॉटेल, लॉज आदी ५५० व्यवसाय येथे आपला चरितार्थ चालवितात, परंतु मागील वर्षापासून कोरोनामुळे येथील व्यवसायावर गदा आली आहे. नुकतेच ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास हॉटेल, लॉज आदी चालू करण्यास व मंदिर उघडण्यास राज्य शासनाने काही नियम व अटींसह परवानगी दिली. सर्व सुरळीत चालू असतानाच पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने भाविक, पर्यटकांची संख्या कमी होऊन, येथील परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच झाली आहे.
दरवर्षी या ठिकाणी देवदर्शन व पर्यटनासाठी मुंबई, पुण्यासह इतर राज्यांतूनही लाखो भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यातून येथील व्यावसायिकांचे अर्थाजन चालते, परंतु सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविक भक्त व पर्यटकांनी भीमाशंकरकडे पाठ फिरविल्याने याचा व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला असून, सर्व व्यवहार ठप्पच झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आठ ते नऊ महिन्यांनंतर शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर उघडण्यास काही अटींसह परवानगी दिली. मात्र, राज्यांप्रमाणे पुणे जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने, देवदर्शनासाठी भाविकांची संख्या कमी होऊन लागली आहे. दिवसभरामध्ये अवघे शंभर ते दीडशे भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे याचा परिणाम स्थानिक छोट्या मोठ्या व्यवसायावर झाला आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना दिवस दिवस बसून काढावा लागत आहे. आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार, अशी चिंता व्यावसायिकांपुढे उभी राहिली आहे.
वेदमूर्ती मधुकरशास्त्री गवांदे
ज्येष्ठ सहकार्यकारी विश्वस्त श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविक भक्तांविना शुकशुकाट दिसत आहे.
( छायाचित्र संतोष जाधव)