कोरेगाव भीमा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी होणारे कार्यक्रम या वर्षीही रद्द करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत समाधिस्थळी शासकीय पूजा होणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या गर्दी वाढून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शासनाने धार्मिक सण, पारंपरिक उत्सव, समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. याचाच एक भाग म्हणून
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे दरवर्षी होणारे कार्यक्रम या वर्षीही प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून केवळ मर्यादित व प्रातिनिधीक स्वरूपात सकाळी ६ ते १० या वेळात मूक पदयात्रा, महाभिषेक, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत समाधिस्थळी शासकीय पूजा व पोलिस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीला पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सरपंच अनिल शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे, ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंच आदींसह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने शंभूभक्तांनी घरीच थांबून अभिवादन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तसेच वढू बुद्रुक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
--
फोटो क्रमा्क - ०८ कोरेगाव भीमा :
फोटो : छत्रपती संभाजी महाराज व समाधी