पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जनाची देशभरात चर्चा होते. दरवर्षी मंडळे वाजतगाजत एका रांगेत लाडक्या बाप्पाला निरोप देतात. लक्ष्मी, केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरून नियमित रांगेत मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात होते. प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या लक्ष्मी रत्स्यावरून मानाचे पाच गणपती विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करतात. त्यानंतर शहरातील मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होते. भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडुशेठचा बाप्पा लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होतो. विसर्जनच्या दिवशी या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक सकाळापासून प्रतीक्षेत असतात. भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदाही मंडळाने दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची पत्रकार परिषद झाली. बाप्पाची आगमन तसेच विसर्जन मिरवणूक कशी असेल, किती वाजता निघेल त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठा सोहल्याविषयी या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सवामध्ये सुरक्षितता त्याचप्रमाणे गणेश भक्तांसाठी आवश्यक सोयी सुविधा महत्त्वाच्या असतात. त्यादृष्टिकोनातून मंडळाकडून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी मंडळानं वर्षानुवर्षे वर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा देत दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक काढली होती. त्याआधी रात्री उशिरा मिरवणूकीला सुरुवात होत होती. त्यामुळे गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं. त्याचप्रमाणे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ हा देखील मोठा प्रश्न बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर दुपारीच म्हणजे मानाच्या गणपती पाठोपाठ विसर्जन मिरवणूक काढून अनंत चतुर्दशीच्या दिवशीच बाप्पाचे विसर्जन करण्याचा नवीन पायंडा मंडळाने गेल्या वर्षीपासून पाडला आहे. यावर्षी देखील तोच शिरस्ता कायम ठेवण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे.
श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ४ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर व मूळचंद दुकानाशेजारी अशा तीन एलईडी स्क्रिन तसेच बुधवार चौक येथे एक स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.