Maval Lok Sabha Result 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. बारणे यांनी ६ लाख ९२ हजार ८३२ मते मिळवीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. ‘घासून नाही तर ठासून आलो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी मंगळवारी विजयानंतर दिली.
मावळमध्ये बारणे, वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार रिंगणात होते. मतदारसंघात २५ लाख ८५ हजार १८ एकूण मतदार असून, दि. १३ मे रोजी १४ लाख २६४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी सकाळी आठला बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणीस सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंघला यांनी स्ट्राँग रूम उघडून सुरुवातीला पोस्टल मतपेट्या आणल्या. त्यानंतर मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली. सुरुवातीस मतमोजणीचा वेग संथ होता. पहिल्या फेरीचा निकाल येण्यास दहा वाजले. पहिल्या फेरीत बारणे यांना ३१,१९५, तर वाघेरे यांना २५,४६४ मते मिळाली. बारणे यांना ५,७३१ मताची आघाडी मिळाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक फेऱ्या झाल्या. दुपारी साडेतीनपर्यंत २५ फेऱ्या पूर्ण झाल्या. मात्र, तांत्रिक अडचण आल्यामुळे अंतिम निकाल जाहीर केला नव्हता. अधिकृत निकाल जाहीर करण्यास सायंकाळचे सहा वाजले.
मतदान केंद्रावर गुलाल उधळला
दुपारी सव्वादोनच्या सुमारास बारणे मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत गुलाल उधळला. उन्हाची तीव्रता वाढत असताना मतमोजणीची उत्सुकताही वाढत होती. ऊन वाढत असताना बारणे आणि वाघेरे यांच्या मतदानाचा आलेख कमी-अधिक होत होता.
विजयाचे फ्लेक्स लागले
बारणे यांनी मतदानानंतर अडीच लाख मतांनी विजय होणार, असा दावा केला होता. त्यानुसार सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी थेरगाव आणि चिंचवड परिसरामध्ये त्यांच्या विजयाचे पोस्टर लागले होते. सोशल मीडियावरूनही दावे केले जात होते.
मावळमधील जय-पराजयाची कारणे काय?
श्रीरंग बारणे यांचा विजय कशामुळे?
- मतदारसंघाची खडानखडा माहिती आणि तयार नेटवर्क- धनुष्यबाण चिन्हावर सलग निवडणूक लढविल्याने चिन्ह परिचित- चिंचवड, पनवेलमधील भाजपच्या मदतीमुळे निर्णायक आघाडी- सर्व सहा आमदार महायुतीचे असल्याने बूथनिहाय मतदान करवून घेण्यात यश- नरेंद्र मोदी यांच्यासाठी मत देण्याच्या आवाहनास शहरी मतदारांचा प्रतिसाद
संजोग वाघेरे यांचा पराभव का झाला?
- नवा चेहरा म्हणून स्वत:ची ओळख आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यात अपयश- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यात पडले कमी- नैसर्गिक नाराजी ‘कॅश’ करण्यात झालेली कसूर- बड्या नेत्यांच्या सोबतीचा अभाव. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची नगण्य मदत- पिंपरी-चिंचवड शहरातील आणि भावकीतील गाडागाडीचे राजकारण मुळावर