पुणे : मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) पुनर्रचना करण्यास अखेर शासनाला वर्षानंतर मुहूर्त मिळाला. मंडळाच्या अध्यक्षपदी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते श्रीरंग गोडबोले यांची नियुक्ती केली आहे. पुण्याच्या अध्यक्षांसह अजून तीन रंगकर्मींची मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.
महाआघाडी सरकार अस्तित्वात येऊन वर्ष उलटले तरी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यास शासनाला सवड मिळालेली नाही, असे वृत्त ‘लोकमत’ने (दि. २) प्रसिद्ध केले होते. शासनाला पुनर्रचना करण्यास मुहूर्त लागला. शासनाकडून मंडळाच्या अध्यक्षांसह २५ सदस्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र अध्यक्षांसह सदस्यांची नियुक्ती ही हंगामी स्वरूपाची राहाणार आहे. सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा (चित्रपट व्यतिरिक्त), मेळा, तमाशा यांसह नाट्य प्रयोगांना मंजूरी देणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे मंडळ करेल. मंडळामध्ये सदस्यपदी पुण्यातील दीपक रेगे, प्रवीण तरडे आणि पिंपरी-चिंचवडच्या गौरी लोंढे यांचा समावेश आहे तर उर्वरित सदस्यांंमध्ये सतीश पावडे, भालचंद्र कुबल, डॉ. महेंद्र कदम, डॉ. वृंदा भरूचा, जयंत शेवतेकर, रमेश थोरात, सुनील ढगे, प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी, प्रभाकर दुपारे, दिलीप कोरके, किशोर आयलवर, लीना भागवत, अनिल दांडेकर, दिलीप ठाणेकर, सतीश लोटके, महेश थोरवे पाटील, विजय चोरमोरे, चंद्रकांत शिंदे, स्मिता शरद भोगले, मधुकर पा. नेराळे आणि प्रदीप रामकृष्ण कबरे यांची नियुक्ती केली आहे.
---
नाट्य क्षेत्रात अनेक वर्षे लेखक म्हणून काम करतो आहे. आता मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे मंडळाचे नियम सर्वांपर्यंत कसे पोहोचविता येतील, मंडळाकडून नाट्य क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत. त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. तसेच लेखकांच्या लेखन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही आणि सरकारचे धोरणही कसे राखले जाईल असा मध्यमार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन.
- श्रीरंग गोडबोले, नवनिर्वाचित अध्यक्ष, मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ