पुणे/हडपसर : लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे अगोदर ठरलेले लांबणीवर पडले. त्यासाठी बुक केलेले मंगल कार्यालयाचा खर्चही वाया गेला.लॉकडाऊनमध्ये पुण्यात शहरात शनिवारी एक अनोखा विवाह पार पडला. त्यात मंडळीपासून ते मामा आणि कन्यादान करणारेही पोलीस होते. आयटी इंजिनिअर असलेला आदित्य बिश्त आणि डॉ. नेहा कुशवाह यांचा आज पुण्यातील अॅमेनोरा क्लबमध्ये विवाह पार पडला. मुलाचे वडील सैन्यात कर्नल असून त्यांचे पोस्टिंग डेहराडूनला आहे. तर मुलीचे वडिल सैन्यात डॉक्टर असून नागपूरमध्ये सध्या कार्यरत आहेत. देहराडुन येथे लष्करात कार्यरत असलेले कर्नल देवेंद्र सिंग बिस्ट यांचा मुलगा आदित्य आणि नागपूर येथील लष्कर मेडीकल कॉलेज मध्ये वैद्यकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणारे कर्नल डॉ. अरविंद सिंग कुशवाह यांची मुलगी डॉ. स्नेहा कुशवा यांचा साखरपुडा फेब्रवारी महिन्यात झाला होता. ते दोघेही पुण्यात असून २ मे रोजी डेहराडुन येथे विवाह निश्चित करण्यात आला होता. पण अचानक लॉकडाऊनचे संकट आले. दोन्ही घरातील प्रमुख हे सध्या कर्तव्यावर असल्याने व प्रवासबंदी असल्याने ते लग्नाला येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी पुणेपोलिसांना विनंती केली. सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा साजरा केला. पोलीस उपायुक्त सुहास बावचे, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व त्यांची पत्नी अश्विनी पाटील यांनी मुलीचे कन्यादान केले. अगदी थोड्या पोलिसांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत पोलिसांनी हा विवाह सोहळा घडवून आणला. दोन्ही परिवारात लष्करी सेवेची परंपरा आहे.कोरोनाच्या संकटात ते त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिसांनी हा विवाह सोहळा घडवून आणला. सुहास बावचे, पोलीस उपायुक्त. ़़़़़़लॉकडाऊनमुळे आम्ही पुण्यात अडकलो. आमचे नातेवाईक विवाहाला येऊ शकत नव्हते. मात्र, पुणे पोलिसांनी आमच्या आई वडिलांपासून ते वऱ्हाडी , मामा, नातेवाईक अशी सर्व कर्तव्य पार पाडत आमचा विवाह सोहळा घडवून आणला. पुणे पोलिसांमुळे आमचा विवाह २ मेच्या मुहूर्तावर लागू शकला. डॉ. नेहा कुशवा (वधू)
शुभ मंगल 'स्पेशल' सावधान! पोलीसच बनले वऱ्हाडी अन् केले मुलीचे कन्यादान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 9:14 PM
दोन्ही परिवारात लष्करी सेवेची परंपरा आहे.कोरोनाच्या संकटात ते त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा साजरा केला..
ठळक मुद्देसैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी केला विवाह सोहळा साजरा