पुणे - कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर गुरुवारी पुण्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिक फिरकलेच नाहीत. तर, बहुतांश जणांना येता आले नाही. अनेक कार्यालयांमध्ये तर कर्मचाºयांनी ‘दांडी’ मारल्याचे चित्र होते. तर, अनेक कार्यालयांमधून महिलांना लवकर सोडण्यात आले होते.बंदच्या काळात सरकारी कार्यालये लक्ष्य केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती इमारतीमधील सहकार, कृषी, शिक्षण या विभागांची आयुक्तालये, कारागृह, अन्नधान्य वितरण कार्यालय, नगररचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, जनसंपर्क कार्यालये, पणन विभाग आदी प्रमुख कार्यालयांमध्ये गुरुवारी अभावानेच नागरिक आलेले दिसत होते. बºयाच कार्यालयांमधील कर्मचारी सुटीवर गेल्याचेही दिसले.तर, नवीन प्रशासकीय इमारतीधील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय, राज्य माहिती आयुक्तालय, जमाबंदी आयुक्तालय; तसेच भूमी अभिलेख, राष्ट्रीय हरित न्यायालय, महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळ आदी विभागांची कार्यालयेही ओस पडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काही आंदोलकांनी ठिय्या दिल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इमारतीचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांची चौकशी आणि तपासणी करूनच इमारतीमध्ये प्रवेश दिला जात होता. येथेही सरकारी कर्मचाºयांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी सरकारी कार्यालयांमध्ये अघोषित सुटी असल्यासारखी स्थिती निर्माण झाली.
सरकारी कार्यालयांमध्ये बंदमुळे शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:35 AM