लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासन आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गुलटेकडी मार्केट यार्डात रविवार असून देखील गूळ-भुसार, भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा, केळी आणि पान बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
शनिवारी-रविवारीदेखील कडकडीत लाॅकडाऊन पाळण्यात आला. याशिवाय मांजरी, उत्तमनगर आणि मोशी येथील उपबाजारही बंद होते.
गुलटेकडी मार्केट यार्डात फळे व भाजीपाला विभागात किरकोळ आवक वगळता बाजार संपूर्णपणे बंद होता. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी शेतीमाल आणू नये, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले होते. त्यास प्रतिसाद मिळाला. दरम्यान, बाजार बंद की सुरू राहणार याबाबत शुक्रवारी साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर अगोदर निघालेल्या गाड्यांतील शेतमाल खाली उतरून घेण्याचे ठरल्याने संंभ्रम दूर झाला. परिणामी, रविवारी बाजार पूर्ण बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. संपूर्ण शहर बंद असणार असल्याने विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होऊ
शकते. तसेच मालही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मार्केट यार्डातील सर्व विभाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केला होता. त्यास प्रतिसाद मिळाला.