लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव ढमढेरे : येथे महाशिवरात्री निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून श्री शंभोनाथ मंदिरात मोठ्या प्रमाणात यात्रा होत असताना या वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द केल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट दिसत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यावेळी नागरिकांनी देखील सहकार्य केल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी गजबजणाऱ्या श्री शंभोनाथ मंदिरात पूर्णपणे शांतता व शुकशुकाट होता.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्री शंभोनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी शंभूनाथ देवस्थान ट्रस्ट व श्रीनाथ तरुण मंडळ यांच्या नियोजनाने महाशिवरात्र यात्रा आयोजित करण्यात येत असते. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वाढल्याने रद्द करण्याचे आदेश देण्यात आहे आहे. यामुळे येथील यात्रा रद्द करून येथे होणारा अभिषेक, पालखी सोहळा, पाउलघडी, गाव भंडारा हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या साथीमुळे रद्द करण्यात आल्याचे शंभूनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कोळकर व रवींद्र मावळे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी देखील ट्रस्टच्या आदेशाचे पालन केले असून घरीच महाशिवरात्री साजरी करण्याचा निर्णय घेतला. परंतु देवाचा अभिषेक तसेच पूजा, शंभूनाथ देवस्थान ट्रस्ट व श्रीनाथ तरुण मंडळ यांच्या वतीने साधेपणाने करण्यात आले. यावेळी देशाला व नागरिकांना कोरोना पासून मुक्त करण्याचे साकडे देवाला घालण्यात आले. त्यानंतर येथे दिवसभर नागरिकांना शंभोनाथाच्या संजीवन समाधीचे दर्शनासाठी बंदी घालण्यात आलेली होती. दर वर्षी गजबजलेल्या अशा या श्री शंभोनाथ मंदिर परिसरात नागरिक व भाविक आलेले नसल्यामुळे येथे दिवसभर शुकशुकाट पसरलेला होता. तसेच पुढील काळात देखील १८ मार्च पर्यंत मंदिर परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे शंभूनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.
फोटो : तळेगाव ढमढेरे येथील श्री शंभोनाथ मंदिर परिसरात शुकशुकाट