पुणे : महापालिका आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला. आयुक्तांनी कोणाच्या दबावावरून असा आदेश काढला, सभागृहाला विश्वासात घेतले नाही, पदाधिकारी गटनेत्यांना काहीही सांगितले नाही, त्याचा खुलासा करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.शनिवारवाडा येथे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीय सभा होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याचे पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेने महापालिकेला कळवले, असे याबाबतचे प्रकटन जाहीर केले त्या वेळी सांगण्यात आले होते, मात्र त्याचा काहीही लेखी पुरावा नव्हता. त्याआधीच काही दिवस झालेल्या एल्गार परिषदेने वातावरणात तणाव निर्माण झाला व त्यातून शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तुला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने असा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा होती. मात्र त्यालाही दुजोरा मिळाला नाही.तरीही आयुक्तांचे जाहीर प्रकटन असल्याने त्याविरोधात लगेचच शहरात चर्चा सुरू झाली. पहिले बिगूल खुद्द महापौर मुक्ता टिळक यांनीच फुंकले. सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे महापौरांनी जाहीर केले. त्यानंतर सर्वच पदाधिकारी सदस्यांनी याविरोधात मत व्यक्त केल्यावर आयुक्तांनी निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. मंगळवारी झालेल्या सभेत भाजपाचेच नगरसेवक धीरज घाटे यांनी हा विषय उपस्थित केला.भाजपाचीही नाराजी, काँग्रेसने मागितला खुलासाकाँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी आयुक्तांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. भाजपाच्या अन्य नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. दिलीप बराटे व आणखी काही नगरसेवकांनी आयुक्तांनी कोणाच्या सांगण्यावरून असा आदेश काढला ते स्पष्ट करावे, अशी मागणी केली.अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारवाडा सुरूच राहणार आहे तिथे सभाबंदी नाही. या विषयावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होईल, त्यानंतर तो सभागृहासमोर आणण्यात येईल व नंतरच काय ते ठरवले जाईल. तोपर्यंत तिथे सभाबंदी नाही, असे महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
शनिवारवाडा सभाबंदीवरून गोंधळ, आयुक्तांना केले लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:50 AM