पुणे : अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे मागे घेण्यासाठी गुरुवारी मार्केटयार्डातील फळे- भाजीपाला विभाग बंद करण्यात आला. या बंदला श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनसह बाजार आवारातील विविध संस्था आणि संघटनांनी केलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
याबाबत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुध्द उर्फ बापू भोसले म्हणाले, बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या लिंबू विक्रीमुळे बाजार आवारात वाहतुक कोंडी होत होती. याविरोधात बाजार समिती प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने त्या लिंबू विक्रेत्यांवर कारवाई केली होती. लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर अधिकारी, अडते यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले.
ते म्हणाले, ही अन्यायकारक गोष्ट असून भविष्यात खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे हे गुन्हे रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि.२०) रोजी बंद करत निषेध व्यक्त केला होता.