लोगो - मन करा रे प्रसन्न
कोणताही आजार, विकार हा मुळात आपला शत्रू नसतोच, उलट त्याचे आपल्यावर उपकारच होतात. कारण त्यामुळे आपल्याला आपली चूक कळून येण्यास मदतच होते. विज्ञानात प्रत्येक कार्यामागे, परिणामामागे काहीतरी कारण असतेच त्याला कार्यकारण भाव म्हणतात. त्याप्रमाणे बहुतेक आजारांच्यामागे कोणता तरी मानसिक विकार, चुकीची विचारधारा हेच मुख्यत: कारण असते.
इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावाशी वाटते की, यामध्ये अपघात, जखमा, विषप्रयोग, विषबाधा, एखाद्या पदार्थाचे अतिसेवन, एखाद्या अवयवांची, शरीराची कायमची झालेली झीज इ. कारणांमुळे होणाऱ्या आजारांचा समावेश नाही.
या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व हे मर्यादित काळापुरतेच आहे. तेव्हा ज्ञान व अनुभव घेऊन त्याचा उपयोग स्वत:च्या प्रगतीसाठी व मानवकल्याणाकरीता करणे हे आपले कर्तव्य आहे. जे चूक आहे ते समजून घेऊन त्याजागी योग्य सद्गुण, सद्विचार प्रस्थापित करुन त्या चुकीचे निराकरण करणे जरुरी आहे.
आपले व्यक्तीमत्व व अंतरात्मा यांच्यात जोपर्यंत उत्तम समन्वय असेल तोपर्यंत आनंद, शांतता व आरोग्य नांदेल जेव्हा यांच्यातील समन्वय नष्ट होईल तेव्हा दु:ख, अशांती व अनारोग्य (आजार) उत्पन्न होतील. तसे मानसिक विकार अनेक प्रकारचे आहेत. पण त्यातील महत्वाचे आणि व्यक्तीच्या व पर्यायाने समाजाच्या विरोधात कृती करायला लावणारे असे काही महत्वाचे विकार पुढीलप्रमाणे :-
१) गर्व - या विश्वाच्या जगाच्या तुलनेत आपण किती छोटे, सूक्ष्म आहोत याचा विसर पडून उगीचच स्वत:ला मोठे समजणे, गर्वाने फुगलेली व्यक्ती सामान्यत: कोणासमोर वाकत नाही. निसर्गाच्या विरोधात कृती घडते.
२) क्रूरता - आपण आपल्या शब्दांनी, कृतीने दुसऱ्याला दु:ख दिल्यास मी त्या महान निर्मात्याच्या विरोधातील कृती ठरते. याचा आपल्याला विसर पडतो.
३) तिरस्कार, द्वेष - सर्व जगत् हे ईश्वराच्या प्रेमातून निर्माण झाले आहे, हे विर्विवाद सत्य नजरेआड करुन आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल दुसऱ्यास जबाबदार धरुन त्याचा द्वेष करणे, मनातले विचार, आपले शब्द आणि शारीरिक कृती तिरस्कारयुक्त असणे हे प्रेमाच्या साक्षात विरोधी आहे.
४) निष्काळजीपणा, दुर्लक्ष - ज्ञान व अनुभव घेण्याची संधी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे व निष्काळजीपणाने वागणे, बोलणे, सुधारणा ना? करणे इ. कृत्ये ईश्वराच्या हेतूंच्या विरोधात असणारच, हो ना?
५) स्वत:बद्दल अतिप्रेम - आपल्या कर्तव्याचा विसर पडून फक्त स्वत:पुरतेच पाहणे, सर्वव्यापी एकात्मतेचा विसर यामुळे हातून चुकीची कृती घडणे हे स्वाभाविकच आहे.
६) अस्थिरता - यात मनाची, विचारांची शरीराची अस्थिरता असते. अंतदात्म्याच्या मार्गदर्शनाकडे व्यक्ती दुर्लक्ष करते. त्यातूनच सारी अस्थिरता निर्माण होते. कार्यहेतू कमजोर होतात.
७) हाव - मनात हाव धरली की, आपण इतरांचा जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार नाकारतो. हे कर्म सुद्धा ईश्वराने मांडलेल्या विश्वाच्या विरोधातच असते.
८) मत्सर, हेवा - इतरांना प्राप्त झालेले वैभव आपल्याजवळ नाही म्हणून मनाची होणारी घालमेल. त्या विचारांमध्येच सर्वांशी विशेषत: वैभव प्राप्त झालेल्या व्यक्तींशी माणुसकी हीनतेने वागणे इ.
क्रमशा...
(वैधानिक इशारा - सदर लेख फक्त मार्गदर्शक आहे. पुष्पौषधींचे सेवन तज्ज्ञ डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानेच करावे.)