पुणे: जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सिद्धांत दाते याने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या नीट परीक्षेत ६८५ गुण मिळवून देशात पन्नासावा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. सिद्धांत हा फर्ग्युसन महाविद्यालयाचाविद्यार्थी आहे. ‘इयत्ता अकरावी पासून सलग दोन वर्षे सातत्याने नीटची तयारी केल्यामुळे परीक्षेत यश मिळाल्या’चे सिद्धांतने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वैद्यकीय परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून नाशिक येथील सार्थक भट याने देशात सहावा आणि महाराष्ट्रात प्रथम,सांगलीच्या साईराज माने याने राज्यात दुसरा तर पुण्यातील सिद्धांत दाते याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. सिद्धांत सुशिक्षित कुटुंबातील असून त्याचे आई -वडील दोघेही शिक्षक आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत राजस्थानच्या नलीन खंडेलवाल ९९.९९ पर्सेन्टाइल आणि ७०१ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये देशात तेलंगणा येथील माधुरी रेड्डी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
सिद्धांत दाते म्हणाला, शिक्षक आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची माहिती असणा-या व्यक्तींचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला नीट परीक्षेत चांगले गुण मिळाले.बारावीच्या परीक्षेपेक्षा मी नीट परीक्षेकडे अधिक लक्ष दिले. इयत्ता अकरावी पासूनच मी नीट परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली.महाविद्यालयाचे वर्ग, खासगी शिकवणी आणि दररोज आठ तास अभ्यास केला.तर सुट्टीच्या दिवशी मिळेल तेवढा वेळ नीटच्या तयारीसाठी घालवला.मित्रांबरोबर ग्रुप डिस्कशन केल्यामुळे अभ्यास अधिक सोपा झाला.जुन्नर येथील कुकडी व्हॅली शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.मला दहावीला ९८.६ टक्के गुण मिळाले.त्यानंतर मी पुण्यात मित्रांबरोबर खोली घेवून फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावी बारावीचे शिक्षण घेतले,असे नमूद करून सिद्धांत म्हणाला, बारावीत मला ८७ टक्के गुण मिळाले. केवळ तासंतास अभ्यास करून उपयोग नाही तर अभ्यासाला योग्य दिशा असणे गरजेचे आहे.मला नीटमध्ये ६८५ गुण, ५० रॅक आणि ९९.९९४९ पर्सेंटाईल मिळाले आहेत.