पुणे - असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्दिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राहुल लोंढे यांनी न्यासने घेतल्या निर्णयांबद्दल माहिती दिली. राहुल लोंढे म्हणाले की, "मंडळाच्या विश्वस्तांची बैठक झाली. मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. काही भक्तांच्या तक्रारी, तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या. मंदिरात काही भाविक येतात. ते कुठल्या जातीचे, धर्माचे पंथाचे असतील. स्त्री असो वा पुरुष. अनेकांचे पेहराव हे समोरच्या व्यक्तींना संकोच वाटेल असे होते."
यावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आपलं मत मांडलं आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या,'सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भात असं सांगण्यात आलेलं आहे की तिथे येणाऱ्या भक्तांनी जे आहे ते तोकडे कपडे घालायचे नाही. जीन्स असेल, वेस्टर्न कपडे चालणार नाहीत. पारंपरिक वेशभूषा करावी. पण आपण जर बघितलं तर आपल्या इथे संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कुणी कसं राहावं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि जो कोणी मंदिरात येतो, तो श्रद्धेने येत असतो. त्यामुळे त्याची श्रद्धा बघायची त्याच्या कपड्यांकडे कुणाचं लक्ष जात नसतं.'
ड्रेसकोड बाबत आपली भूमिका मांडतांना त्या पुढे म्हणाल्या,'भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही लावू शकत नाही कारण सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जगभरातून जे लोक येतात, ते वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्मांची वेगवेगळी वेशभूषा असते, ते त्यांच्या वेशभूषेत जे आहे ते दर्शनाला येत असतं त्यामुळं या संदर्भामधील सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय मागे घेतला पाहिजे कारण कुणीही चुकीचे कपडे घालून मंदिरात दर्शनाला येत नाही. मंदिरात दर्शनाला कसं यावं हे भक्तांना चांगलं कळतं. ते तुम्ही शिकवण्याची अजिबातच गरज नाही.'