पुणे : गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली, त्यावेळी आपण गुजरातमधील मुद्रा पोर्ट गावात असल्याचा संतोष जाधव दावा करीत असला तरी त्यांची खातरजमा करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
संतोष जाधव हा सोशल मीडियावरुन बिष्णोई गँगशी गेल्या ३ वर्षांपासून संपर्कात आहे. बाणखेले याचा खून केल्यानंतर तो राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना येथे गेले होता. बिष्णोई टोळीनेच त्याला आश्रय दिला होता. दिल्लीतील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने चौकशी केली. त्यात त्याने संतोष जाधवला ओळखत असल्याची व त्याच्याशी संबंध असल्याची त्याने कबुली दिली. संतोषवर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लॉरेन्सच्या मुळ गावीही संतोष जाधव जाऊन राहिला होता. मात्र, मुसेवाला हत्याकांडाच्या वेळी तो शूटर म्हणून उपस्थित होता का याची पडताळणी पंजाब पोलीस करीत आहेत. आमच्याकडे जी माहिती ती आम्ही त्यांना दिली आहे. जी एजन्सी जो तपास करीत आहे, त्यांनी त्याची पुष्टी करुन माहिती द्यावी. याबाबत अधिकृत माहिती पंजाब पोलीसच देतील, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
अशी आहे या टोळीची कार्यपद्धतीबिष्णोई टोळीतील अनेक जण एक तर परदेशात असून काही तुरुंगात आहेत. त्यांची पाळेमुळे ६ ते ७ राज्यात पसरली आहेत. याच टोळीतील पाच जणांनी आपणच मुसेवाला याची हत्या घडवून आणल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावरुन ते सपंर्कात असतात. एकेका गुंडाची सोशल मीडियावर १० -१० अकाऊंट असल्याचे दिसून आले आहे.
ते छोट्या मोठ्या गुन्ह्यात सापडलेल्या गुन्हेगारांना मदत करण्याचा बहाणा करुन आश्रय देतात. त्याच्या जोरावर त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्हे करवून घेत असतात. प्रत्यक्षात टोळीच्या या सदस्यांना ते खूप मदत करतात,असे काही नाही. मात्र, मोठ मोठे दावे केले की, त्यांची भिती पसरवून ते आपली किंमत व खंडणीची रक्कम वाढवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातूनच अधिकाधिक गुंडांना आपल्या टोळीत ओढण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी सांगितले.