पुणे : किल्ले सिंहगडच्या कोंढणपूर फाट्याजवळ वाघाचे दर्शन झाल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यांनी याबाबतची माहिती हवेली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे वन विभाग आणि पोलीस विभाग सतर्क झाला असून, त्यांनी त्याविषयीची खात्री करून घेण्यासाठी यंत्रणा हलविली आहे. याबाबत नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन केले असून, वन विभागाचे पथक घटनास्थळी गेले आहे.
वारजे माळवाडी येथे राहणारे प्रविण वायचळ व पूजा वायचळ हे पती-पत्नी सिंहगडावर फिरायला गेले होते. सायंकाळी घराकडे येताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोंढणपूर फाट्यापासून काही अंतरावर गोळेवाडीच्या बाजूला वाघ त्यांना रस्ता ओलांडताना दिसला. दोघेही प्रचंड घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा केला. इतर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना त्यांनी याची माहिती दिली.
वायचळ दाम्पत्याने हवेली पोलीस ठाण्यात येऊन वाघ दिसल्याची माहिती दिली. त्याची नोंद पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केली आहे. सदाशिव शेलार यांनी घटनास्थळाकडे जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाघ आहे की, नाही याविषयी खात्री पटत नाही, तोपर्यंत नागरिकांनी त्या परिसरात जाणे टाळावे, असेही शेलार यांनी सांगितले आहे.
पायाच्या ठशांची पाहणी करून ठरवणार
पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाली आहे. त्या वाघाचा फोटो उपलब्ध नाही. त्यामुळे आहे की नाही, या विषयी नक्की काहीच सांगता येत नाही. पायाच्या ठशांची पाहणी करून नंतर ठरवता येईल. - प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे वन विभाग