पुणे : शहरातील वाहतूक कोंडीनेपुणेकरांना जेरीस आणले आहे. मागील आठवड्यात शहरात अनेक रस्त्यांवर झालेल्या अभुतपूर्व वाहतूक कोंडीनंतर मंगळवारीही पुणेकरांना असाच अनुभव आला. सकाळी शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते. शहरात आठवड्याभरापुर्वी सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. यादिवशीही दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच अनेक रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा कोलमडून गेली होती. मंगळवारी सकाळीही शहरातील काही रस्त्यांवर पाहायला मिळाली. सकाळपासूनच शहरात सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणी साठले. तसेच रस्ते निसरडे झाल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. त्यातच काही रस्त्यांवरील सिग्नल सकाळी बंद पडले होते. यावेळेत शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाली. कर्वे रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापुर रस्ता, नगर रस्ता तसेच शहरातील अन्य काही मोठे रस्ते व त्यालगतच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कर्वे रस्त्यावरील काही सिग्नल बंद पडल्याने काही काळ मोठी कोंडी झाली. तसेच मेट्रोच्या कामामुळे काही भागात हा रस्ता अरूंद झाला आहे. त्यामुळे लगतच्या रस्त्यांवर वाहनांचा ओघ वाढला. त्यामुळे वाहतुक पोलिसांना लहान-मोठ्या चौकांमध्ये भर पावसात उभे राहून कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावा लागला. जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी तर अन्य काही भागात पीएमपी बस बंद पडल्याने वाहतुक कोंडीत आणखी भर पडली. काही काही काळ फर्ग्युसन रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
बंद सिग्नलमुळे पुणेकर वाहतुक कोंडीने त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 8:38 PM
पावसाची संततधार आणि काही मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने ही कोंडी झाली. त्यामुळे भर पावसात चौकात उभे राहून वाहतुक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होते.
ठळक मुद्देपोलिसांकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न