लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ नाही, त्यामुळे चौकाचौकातील सिग्नल बंदच आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्यांची संख्या वाढलेली असताना पार्किंगचा प्रश्न, सतत होणारी वाहतुकीच्या कोंडीने बारामती शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी आता चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवली जाणार आहे. मात्र, पार्किंग प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त कारवाईची आवश्यकता आहे. बारामती शहरात लाखो रुपये खर्च करुन उभारलेली वाहतूक नियंत्रक दिवे यंत्रणा बंद आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून वाहतुकीच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषत: चौकात रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतुकीची समस्या सोडवा, अशी मागणी नागरिकांची आहे. बारामती शहराचा विस्तार वाढत आहे. वाढीव हद्दीत योग्य नियोजन होऊ शकते. परंतु जुन्या हद्दीतील बाजारपेठांमध्ये व्यापर संकुल उभारताना वाहन तळासाठी जागा ठेवणे सक्तीचे करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. सौरऊर्जेवर आधारित वाहतूक नियंत्रण दिवे इंदापूर चौकातउभारले आहेत. त्यासाठी ४० लाख रूपये खर्च करण्यात आला होता. त्यापूर्वी भिगवण चौक, पेन्सिल चौक याठिकाणी वाहतुक नियंत्रक दिवे बसवले. त्यानंतर याच वर्षी शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्यात आले आहेत. त्या दिव्यांचे उद्घाटन केल्यापासून एकाही वाहनाला नियंत्रण केले नाही. याशिवाय तीन हत्ती चौक, पंचायत समिती अशोकनगर, एमआयडीसी चौक, कारभारी अण्णा चौक, गुणवडी चौकात देखील वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. हे दिवे केवळ शोभेचे असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. हे दिवे सुरु नसल्याने वाहनांवर, वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. बारामती शहराचा विस्तार होत असताना जुन्या हद्दीतील मुख्य बाजार पेठांमधील वाहतुकीचा प्रश्न कायमच राहणार आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर दुतर्फा वाहने लावली जातात. सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी रिक्षा भोंगा लावून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर जैसे थे स्थिती आहे. पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी, सायकलवर जाणारे विद्यार्थी, तसेच वाहनचालकांची भिगवण चौकात मोठी गर्दी होते. त्यातच वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने नियंत्रण नसलेले वाहनचालक पुढे जाण्याच्या शर्यतीमधून वाहने चालवितात. या वेळी विद्यार्थी, पादचारी यांना अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या चौकासह इंदापूर चौकातदेखील हेच चित्र आहे. बसस्थानकापासून जवळ असल्याने या चौकात कायम गर्दी असते. विशेषत आठवडे बाजारा दिवशी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. एमआयडीसी चौकामध्ये कामगार वर्ग सुटल्यानंतर तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्या वेळी भर चौकात एकच गर्दी होते. या वेळी वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते. त्यातून अपघात होण्याची भीती व्यक्त होते. काही वर्षांपूर्वी एका शालेय विद्यार्थिनीचा वाहतूक नियंत्रक दिवे बंद असल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन वाहतूक नियंत्रण दिवे तत्काळ सुरु झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर हे वाहतूक नियंत्रक दिवे बंद झाले.
वाहतुकीला अडथळा दिरंगाईच्या ‘सिग्नल’चा
By admin | Published: June 10, 2017 1:59 AM