पुणे : शहरात साधारणत: रात्री नऊनंतर वाहतूक पोलिसांची ड्यूटी संपली आणि सिग्नल यंत्रणा बंद झाली की वाहनचालक सर्रास नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेजबाबदार वाहनचालकांना आता 'ब्रेक' लागणार आहे. अशा वाहनचालकांवर आता सिग्नल आणि वाहतूक पोलिसांची नजर मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावर मध्यरात्रीही वाहतूककोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांना मध्यरात्री दोनपर्यंत वाहतूक नियमनाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना आता रात्रपाळीत काम करावे लागणार आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम विभागून देण्यात येणार आहे.
यापूर्वी वाहतूक पोलिसांना रात्रपाळीत काम करावे लागत नव्हते. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत वाहतूक पोलीस एकाच पाळीत काम करत होते. गेल्या काही वर्षांपासून शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकात मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी होत असल्याचे पाहायला मिळते. अनेक रस्त्यांवर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असलेले भाग
कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, जंगली महाराज रस्ता, बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, स्वारगेट, मार्केट यार्ड, हडपसर, कोथरूड भागातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. या विभागातील वाहतूक पोलिसांना मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियोजनाचे काम करावे लागणार आहे. तसेच या भागातील सिग्नल यंत्रणा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. किरकोळ किंवा गंभीर अपघात झाल्यास रात्रपाळीत नियुक्तीस असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोंडी सोडविण्यास प्राधान्य
पावसाळ्यात प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ होतो. झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतूक विस्कळीत होऊन ठिकठिकाणी कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीचे नियोजन करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असल्याने वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने पोलिसांच्या कामाचे नियोजन केले आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त