पुणे : संसदेत संमत झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) विराेध करण्यासाठी फर्ग्युसनच्या आंबेडकराईट्स स्टुडंट्स असाेसिएशनच्या विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी माेहिमेचे साेमवारी आयाेजन केले हाेते. फर्ग्युसनच्या प्रमुख प्रवेशद्वारासमाेर ही माेहिम राबविण्यात येणार हाेती. या माेहिमेला आता पाेलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत परवानगी नाकारली आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयक नुकताच संसदेच्या दाेन्ही सभागृहांमध्ये संमत करण्यात आले. हे विधेयक संविधान विराेधी असल्याचे म्हणत देशातील विविध भागांमध्ये आंदाेलने करण्यात येत आहेत. नाॅर्थ इस्ट, दिल्ली या ठिकाणी या आंदाेलणांना हिंसक वळण लागले आहे. हे विधेयक संविधानाच्या मुलभूत तत्त्वांच्या विराेधात असल्याचे म्हणत संविधानाच्या संरक्षणार्थ स्वाक्षरी माेहीम राबविण्याची परवानगी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी डेक्कन पाेलिसांकडे मागितली हाेती. फर्ग्युसनच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर ही माेहीम राबविण्यात येणार हाेती. या माेहिमेला आता पाेलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगत परवानगी नाकारली आहे. तसेच परवानगी नाकारली असताना ही माेहीम राबविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पाेलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत बाेलताना आंबेडकराईट्स स्टुडंट्स असाेसिएशनचा संताेष रासवे म्हणाला, नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विराेध दर्शविण्यासाठी आम्ही स्वाक्षरी माेहीम राबविणार हाेताे. यासंबंधी आम्ही डेक्कन पाेलिसांना परवानगी मागितली हाेती. सुरुवातीला आम्हाला पाेलिसांनी परवानगी दिली हाेती. परंतु आज पाेलिसांनी बाेलावून घेत माझी चाैकशी केली. तसेच या दाेन्ही कायद्यांबाबत माहिती विचारली. नंतर कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत आम्हाला परवानगी नाकारण्यात आली आहे. परवानगी नाकारण्यात आल्याने आम्ही उद्याचा कार्यक्रम रद्द केला आहे.