पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोमवारचा दिवस शहरासाठी मोठा दिलासादायक ठरला आहे. सोमवारी दिवसभरात केवळ ९७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेत एवढी कमी संख्या यापूर्वी २५ जानेवारी रोजी शहरात नोंदविली गेली असून, यादिवशी ९८ रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर मात्र सातत्याने रूग्णसंख्या वाढतच राहिली होती. दरम्यान कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्याही आज २ हजाराच्या आत आली असून, ती १ हजार ९३६ इतकी खाली आली आहे.
पुणे महापालिकेच्या तपासणी केंद्रासह शहरातील विविध प्रयोगशाळांमध्येही आज ५ हजार ७७८ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १.६७ टक्के इतकी आहे. आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. तर शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २४५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ६८ हजार २१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ९५९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८१ हजार १३३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८९० जणांचा मृत्यू झाला आहे.