पुणे : शहरात सोमवारी (दि.२३) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी म्हणजेच केवळ ९७ कोरोनाबाधितांची संख्या दिसून आली होती. पंरतु, गेल्या तीन दिवसांत सोमवारच्या तुलनेत अडीच ते तीनपट अधिक कोरोनाबाधित शहरात आढळून आल्याने कोरोना संसर्ग डोके वर काढत आहे का अशी शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़ संजीव वावरे यांनी, दोन-तीन दिवसांमधील कोरोनाबाधितांच्या वाढलेल्या संख्येच्या आधारावर आपण शहरात कोरोनाची तिसरी लाट आली असे म्हणू शकत नसल्याचे सांगितले आहे.
शहरातील गेल्या तीन दिवसांमधील वाढीमुळे कोरोनाबाधितांची टक्केवारी वाढली आहे. मात्र एखाद्या विशिष्ट भागात जेथे कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत, त्या ठिकाणी झालेल्या संशयितांच्या अधिकच्या तपासण्यांचा हा परिणाम असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या अधिक आढळून येत असली तरी, यामध्ये बहुतांशी रुग्ण हे लक्षणेविरहित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली हे दोन-तीन दिवसांमधील आकडेवारीवरून निदान करणे योग्य नाही, असेही महापालिकेचे म्हणणे आहे.
--------------------------