सदर आकडेवारी ९ जुलैनंतरची आहे. रूग्ण कमी झाले म्हणून आरोग्य विभागाने परिसरातील कोविड केअर सेंटर बंद केली आहेत. त्यामुळे बाधितांना नाईलाजाने गृहविलगीकरणात राहावे लागते आहे. यामुळेही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रूग्णवाढ होते आहे हे लक्षात येवूनही नागरिक मास्क न वापरता फिरत असताना दिसत आहेत. तर शनिवार व रविवारी कडक लॉकडावून असूनही बहुतांश दुकाने उघडी असतात ही धोकादायक बाब आहे. यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. परंतु धडक कारवाई होताना मात्र दिसत नाही.
येथील आठवडे बाजारासमोर पहाटे तर कवडीपाट टोलनाका येथे महामार्गावर दुपारी भरत असलेल्या होलसेल भाजी बाजारात अनेकजण विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सूचना देण्याची गरज आहे. या दोन्ही ठिकाणी परिसरातील शेतकरी व व्यावसायिक आपला शेतमाल विक्री करण्यासाठी आणतात. या परिसरांत उत्तरोत्तर कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या बाजारामध्ये बहुतांश खरेदीदार व विक्रेते विनामास्क असतात. तसेच खरेदीदार हे पुणे परिसरातून येत असतात. येथे होत असलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने येथील आठवडे बाजार प्रशासनाने बंद ठेवला आहे. असे असतानाही रोज याठिकाणी मोठी गर्दी जमलेली असते.
सदर बाजार रस्त्यावर भरत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच विक्रेते उर्वरीत व सडका शेतमाल तेथील मोकळ्या मैदानात फेकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत आहे व या दुर्गंधी मुळे लोकाच्या आरोग्यला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे यांचेवर काही निर्बंध लादले जावेत, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.