पुणे :पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होण्याची चिन्हे वाढली आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून, संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात, अशी विनंती पत्रात केली आहे. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. याबाबत सोमवारी संरक्षणमंत्र्यांना भेटणार आहेत.
पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यस्त विमानतळांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे व सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो, असे या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.
पुणे हे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब असल्याने या प्रस्तावामुळे शहराच्या विकासाला आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी योग्य सूचना देण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी संरक्षणमंत्र्यांनाही भेटणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार.