लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर, तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:56 PM2024-05-30T13:56:41+5:302024-05-30T14:00:21+5:30
जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शरयु फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू केले आहेत. दर मंगळवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहत आहेत....
बारामती : पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीच्या राजकारणाचे चित्र बदलून गेले आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार लाेकसभा निवडणूूक संपल्यानंतर अवघ्या ८ दिवसातच पुन्हा कार्यरत झाले. युगेंद्र यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यालयात प्रत्येक आठवड्यात येण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी चुलते अजित पवार यांच्या विरोधात जात खासदार सुप्रिया सुळे यांचा सक्रिय सहभाग घेत प्रचार केला. सध्या युगेंद्र पवार हे निवडणुका संपल्यावर नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर देत आहे. जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शरयु फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू केले आहेत. दर मंगळवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांचा प्रभावी जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते. राजकारणाबाबत वेळ आल्यावर पाहू, सध्या लोकांचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात गेल्या आठवड्यापासून ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. पक्ष कार्यालयात जय पवार हे नागरिकांना भेटत आहेत. बुधवारी (दि. २९) त्यांनी बारामतीत नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी; अडचणी समजून घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील राष्ट्रवादी भवनात नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या अडचणी आणि कामांबाबत जय पवार यांनी चर्चा केली.
आगामी काळात ‘पवार विरुद्ध पवार’ राजकारण रंगणार?
सलग दोन आठवड्यांपासून जय पवार हे बारामतीत येत आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील संपूर्ण पवार कुटुंब विरोधात प्रचार करीत असताना जय पवार यांनी आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. आता निवडणूक संपल्यावर जय पवार पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहेत. उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी देखील लोकसभा निवडणुकीत थांबलेला जनता दरबार पुन्हा सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्याने बारामतीच्या राजकारणात त्यांचे धाकटे चिरंजीव अधिक लक्ष घालणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बारामतीत आता आगामी काळात ‘पवार विरुद्ध पवार’ राजकारण रंगताना पहावयास मिळेल.