लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : महाराष्ट्रातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रश्नावर येथे मौन बाळगले़ तसेच लोणावळा शहरातील विकासकामे वगळता मावळातील गुन्हेगारीविषयी ते काहीही बोलले नाहीत. लोणावळा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, माजी आमदार दिगंबर भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी उपस्थित होते.ज्या गतिमानतेने प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण केले. त्याच गतिने प्रशासन चालवून सामान्यांना मदत होईल, असे काम करा. लोणावळ्यास पर्यावरणपूरक शहर बनवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, शहराचे घनकचरा विलगीकरणाचे प्रमाण ४० टक्के आहे. ते शंभर टक्के करत कचऱ्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करा. लोणावळा महाराष्ट्रतील पर्यटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असल्याने या शहराला पर्यावरणपूरक शहर बनवत पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या. पाणीपुरवठा योजनेकरिता ३४ कोटी दिले आहेत. रुग्णालय, बहुमजली पार्किंग, तलाव, रोप वे आदींसाठी निधी कमी पडू देणार नाही. लोणावळ्यातील बांधकाम नियमावलीतील सहा मीटरची अडचण सोडविण्यासाठी लक्ष देऊ. पण, केवळ काँक्रीटची जंगले उभी राहून चालणार नाहीत. पर्यावरणपूरक शहरे पर्यटकांचे नंदनवन आहे. ते सौंदर्य न राहिल्यास पर्यटक दुसऱ्या जागा शोधतील. लोणावळा शहराला स्वच्छ व सुंदर बनवा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. शहरे ही विकासाची इंजिने असल्याने गेल्या दोन वर्षात शहरांसाठी २१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रास्ताविक नगराध्यक्षा जाधव यांनी तर आभारप्रदर्शनउपनगराध्यक्ष पुजारी यांनी केले. मान्यवरांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
मावळातील गुन्हेगारीविषयी मौन
By admin | Published: June 02, 2017 2:06 AM